३० हजाराचा दंड वसूल ; उद्यापासून तीव्र कारवाईचा प्रशासनाचा इशारा…
मालवण, ता. २४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली असून वाहनांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही विनाकारण वाहनांनी फिरणाऱ्या सुमारे १०० हून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उद्यापासून ही कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान उद्याचा गुढीपाडवा सण घरातच साध्या पद्धतीने साजरा करावा अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
संचारबंदी असल्याने गरजेशिवाय कोणीही बाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने केल्या. मात्र त्यानंतरही आज अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत सुमारे १०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करत ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उद्यापासून ही कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.