“लॉकडाऊन” काळात जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार…

2

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या नागरिकांना सूचना…

ओरोस ता 25
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन २१ दिवसाच्या कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये आता सर्व सेवा बंद होणार आहेत की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. पण कर्फ्यूच्या दरम्यानही सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन झाले असले तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही. त्यासाठी शासन-प्रशासन संपूर्णतः प्रयत्नशील असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी संयुक्तरित्या केले आहे.
दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अन्नधान्य, भाजीपाला, दूध, ब्रेड, औषधे अशा वस्तूंचा नियमित पुरवठा होण्याकरिता शासनस्तरावर संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. याकरिता शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे पालन करावे. घाबरून जाऊ नये. या वस्तूंचा पुरवठा नियमीत व सुव्यवस्थितरित्या होणार आहे. याची खात्री बाळगावी.
जनता कर्फ्यूच्या दरम्यान आणि मंगळवार पासून आपल्या राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरू राहणार आहेत.
कोणीही अजिबात घाबरू नये. जीवनावश्क बाबीचा कोणताही तुटवडा होणार नाही. त्यामुळे आपणाला लागणाऱ्या आवश्यक तेवढ्याच किराणा, भाजीपाला व इतर बाबीची खरेदी करावी. कोणीही अजिबात घाबरू नये
आपली काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त दौंड व जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

3

4