रुग्णांना अशीच चांगली सेवा द्या असे केले आवाहन…
वेंगुर्ले,ता.२५: कोरोना साथरोग पार्श्वभूमीवर काल जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक व जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल यांनी आरोग्य विभागाला भेट देऊन आरोग्य विषयी माहिती घेतली. तसेच अशीच चांगली सेवा येणाऱ्या रुग्णांना द्या असे आवाहन त्यांनी आरोग्य विभागाला केले.
वेंगुर्ला शहरी भागात आलेल्या व्यक्तींची त्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली व सूचना केल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील ग्रामीण भागात अन्य भागातून आलेल्या व्यक्ती व त्या व्यक्तींची तपासणी आणि पूर्व इतिहास याची माहिती घेतली. तसेच या अनुषंगिक केलेल्या उपाय योजना व आवश्यक उपाययोजना याबाबत आरोग्य यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.
ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली, प्रा. केंद्र रेडी या सर्व ठिकाणी ही भेटी दरम्यान आवश्यक असलेले मास्क व जंतुनाशक यांची उपलब्धता व भविष्यातील आवश्यकता याचा आढावा घेतला.तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून गावात पूर्णपणे सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच प्रत्येक घरातील लोकांनी उगाचच विनाकारण घराबाहेर फिरू नये तसेच मास्क व जंतुनाशक याचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत आदी सूचना देखील आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी पोहोचले आहे. तसेच तेरेखोल ही गोवा समुद्र मार्ग असलेली सीमा देखील बंद करण्यात आली असून त्याठिकाणी आरोग्य विभाग व पोलीस यांचा संयुक्त पथक यांची नियुक्ती केलेली आहे. या ठिकाणी मानवी शरीराचे तापमान तपासण्यासाठी व पटकन आवश्यकते प्रमाणे कार्यवाही होण्यासाठी त्याठिकाणी इयर थर्मामीटर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ग्रामीण रुग्णालयात देखील हा थर्मामीटर ठेवण्यात आलेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी घाबरून न जाता गावात या कोरोना बाबत कोणा मध्ये लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेला कळवून सहकार्य करावे असे आव्हान अध्यक्ष समिधा नाईक व दादा कुबल यांनी केले. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राहुल, रेडी सरपंच रामसिंग राणे आदी उपस्थित होते.