रत्नागिरीतून गोवा पर्यटनासाठी आलेले पाच जण बांद्यात अडकले…

2

लॉकडाऊनचा फटका; पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने राजापूरकडे रवाना…

बांदा, ता.२६: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असताना राजापूर (जि. रत्नागिरी) येथील ५ महाविद्यालयीन तरुण-तरुणींना जीवाचे गोवा करणे चांगलेच महागात पडले. गोवा फिरायला गेलेल्या या ग्रुपला घरी परतण्यासाठी वाहनाची सोय न झाल्याने दोन रात्री त्यांना बांदा शहरात काढाव्या लागल्या. आज सकाळी बसस्थानकात संशयास्पदरित्या फिरताना बांदा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना खासगी वाहनाने राजापुरकडे रवाना केले. तत्पूर्वी सर्वांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली.
यामध्ये २ तरुण व ३ तरुणींचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात संचारबंदी असताना या सर्वांनी गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गोव्यात गेल्यानंतर त्यांना ठिकठिकाणी चौकशीला सामोरे जावे लागले. गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने त्यांनी पुन्हा परतीचा मार्ग स्वीकारला. सर्वजण खासगी वाहनाने गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर आलेत. तेथून बांदा शहरात प्रवेश केला.
देशात लॉकडाऊन असल्याने वाहतुकीची सर्व साधने बंद आहेत. त्यामुळे या तरुण-तरुणींनी बांदा शहरात दोन रात्री काढल्या. आज राजापूरकडे जाण्यासाठी सकाळी हे सर्वजण बांदा बसस्थानकात वाहन मिळते का याची वाट पाहत होते. बांदा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेत सर्वांना ताब्यात घेतले. देश कोरोनाच्या संकटात असताना गोवा फिरायला गेलेल्या या सर्वांना पोलिसांनी खडे बोल सुनावले. यावेळी तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी माणुसकी दाखवत सर्वांना बिस्कीट, पाण्याचे वाटप केले. पोलिसांनी खासगी वाहनातून या सर्वांना राजापूरकडे रवाना केले.

0

4