सिंधुदुर्ग किनारपट्टीवर खुलेआम अनधिकृत मासेमारी…

2

संचारबंदी झुगारून समुद्रात संघर्षास तयार ; मच्छीमार नेत्यांची माहिती…

मालवण, ता. २७ : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पोटाला चिमटा काढून जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारी व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनधिकृत एलईडी आणि हायस्पीड मासेमारी बिनदिक्कत सुरू आहे. याबाबत शासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने मच्छीमार संघटनांनी संचारबंदी झुगारून समुद्रात संघर्ष करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती मच्छीमार नेत्यांनी दिली.
श्रमिक मच्छिमार संघाचे छोटू सावजी, बाबी जोगी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मासेमारी बंद आहे. मासे विक्रीवर प्रशासनाने बंदी आणली आहे. शासनाने मत्स्य व्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट केला असला तरी सामाजिक बांधिलकी म्हणून पोटाला चिमटा काढून जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे सर्व प्रकारे दाद मागूनही न्याय मिळत नसल्यामुळे स्थानिक मच्छीमारामध्ये तीव्र नाराजी आहे. याची गंभीर दखल सर्व मच्छीमार संघटनांनी घेतली आहे.
मच्छीमारांच्या मागणीची शासन दखल घेत नसल्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी संचारबंदी मोडून समुद्रात संघर्ष करण्यासाठी संघटना सज्ज झाल्या आहेत. मलपी-कर्नाटक, आचरा-मालवण, मिरकरवाडा -रत्नागिरी, ससून डॉक-मुंबई, रायगड मधील काही बंदरांमध्ये नौकाद्वारे अनधिकृत मासेमारी सुरू आहे. या मासेमारीवर अंकुश न आणल्यास समुद्रातील संघर्ष अटळ आहे असा इशारा देताना उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन, केंद्र आणि राज्य शासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

4

4