Friday, December 5, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुबंईस्थित चाकरमान्यांनी संयम ठेवत १४ एप्रिलपर्यंत मुबंईतच राहावे...

मुबंईस्थित चाकरमान्यांनी संयम ठेवत १४ एप्रिलपर्यंत मुबंईतच राहावे…

वैभव नाईकांचे आवाहन ; चाकरमान्यांनी गावबंदीचा गैरसमज करून घेऊ नका…

मालवण, ता. २८ : मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असलेल्या मुंबईस्थित चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. या मुंबईस्थित चाकरमान्यांनी संयम ठेवत १४ एप्रिलपर्यत मुंबईतच राहावे. ग्रामस्थांनी तुम्हाला गावबंदी केलेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
आमदार नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत नोकरी व्यवसायानिमित्त मुबंईत वास्तव्यास असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोक मुंबई येथे अडकले आहेत. त्यांची संख्याही खूप आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईस्थित चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण गावी येण्यासाठी प्रयत्न करत आहात, अनेक लोकांशी संपर्क साधत आहात. तुम्हाला सिंधुदुर्गात येण्यास सिंधुदुर्गवासीयांनी बंदी आणली असा आपल्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. परंतु सिंधुदुर्गवासियांनी सिंधुदुर्गात येण्यास कोणालाही विरोध केलेला नाही अथवा गावबंदी केली नाही. लॉकडाऊनच्या आधी सुमारे २२ हजार लोक गावामध्ये दाखल झाले आहेत. त्या सर्वांची नोंद प्रशासनाकडे आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्याला लॉकडाऊन केले आहे. आज जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत आपल्या गावी असलेल्या नातेवाईकांच्या, आईवडिलांच्या ज्या काही अडचणी असल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासन, आपल्याशी संपर्क साधावा. सध्या रेल्वे, बस तसेच खासगी वाहतूकही बंद आहे. लॉकडाऊन परिस्थितीत अनेक लोकांनी महामार्गावरून गावी येण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ही वाटेतच अडकले आहेत. त्यामुळे मुंबईस्थित असलेल्या सिंधुदुर्गवासियांनी १४ एप्रिल पर्यत मुंबईतच थांबावे. तुमच्या प्रमाणेच आमचेही बहीण, काका व इतर नातेवाईक मुंबईत अडकले आहेत. त्यामुळे कोणाही घाबरून जाऊ नये. मुंबईत काही अडचणी आल्यास खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधावा. मुंबईत ते आपल्याला आवश्यक ती मदत करतील. त्याचबरोबर गावच्या लोकांबद्दल गैरसमज करू नये.
खरंतर या परिस्थितीत गोवा व कोल्हापूर येथील वैद्यकीय सेवा देखील लॉकडाऊन झाली आहे. जिल्ह्यात येणार्‍या आवश्यक सुविधांपैकी दूध, भाजीपाला हे देखील मर्यादित स्वरूपात आहे. एक कोरोना रुग्ण मुंबई वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आल्यामुळे त्या पंचक्रोशीतील अनेक गावांतील घराघरांची तपासणी सुरु आहे. त्यामुळे प्रशासनावर याचा मोठा ताण पडत आहे. काही कालावधीनंतर निश्चित ही परिस्थिती सुधारेल. त्यामुळे लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत आपण ज्याठिकाणी आहात त्या ठिकाणीच थांबावे. मुंबई आणि सिंधुदूर्गाचे नाते हे अतूट आहे. वेळोवेळी मुंबईकरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मदत केली आहे ती आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्याबद्दल जराही मनात शंका आणू नये. कोरोनाच्या संसर्गापासून आपणा सर्वांना वाचविण्यासाठी शासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या नियमांचे पालन करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, असेही आमदार नाईक यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments