रामनवमी उत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध…

2

मंदिरात पुजाऱ्यानेच पूजा करावी, महाप्रसाद वाटू नये ; तालुका प्रशासनाच्या सूचना…

मालवण, ता. २९ : कोरोनाचा फटका रामनवमी उत्सवालाही बसला आहे. रामनवमी उत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. अत्यंत छोट्या पद्धतीने हा सण साजरा करावा, मंदिरात केवळ पुजाऱ्यानेच पूजेसाठी उपस्थित राहावे तसेच महाप्रसादही वाटू नये, अशा सक्त सूचना तालुका प्रशासनाने दिल्या आहेत.
तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी आणि पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी संयुक्तरित्या दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. याचा धोका आपल्या देशालाही निर्माण झाला आहे. या विषाणूवर कोणतीही लस आज तरी उपलब्ध नाही. परंतू या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संक्रमण थांबवणे होय. हे संक्रमण थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नये असे आवाहन जनतेला केले आहे. २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात सीआरपीसी चे कलम १४४ (नागरी भागासाठी प्रतिबंधात्मक आदेश) लागू केला असल्याने पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये, असे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी २३ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात साजरे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. त्यामुळे यावर्षी आपल्या प्रथा, परंपरा थोड्या कमी प्रमाणात पाळून २ एप्रिल रोजीचा रामनवमी उत्सव केवळ मंदीरात पूजारी पूजा करून साजरा करतील. हा उत्सव कोणत्याही परिस्थितीत मोठ्या स्वरूपात साजरा करू नये. रामनवमी दिवशी महाप्रसाद वाटप करू नये, कोरोना विषाणूचा संसर्ग देशातील कोणाही नागरिकाना होऊ नये, यासाठी पूर्ण वेळ कार्यरत असणारी अत्यावश्यक सेवा यंत्रणा, महसूल विभाग, आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, स्वच्छता यंत्रणा, सावर्जनिक वाहतूक यंत्रणा, प्रशासन व अत्यावश्यक सेवा यंत्रणा याचे प्रतिनिधी अहोरात्र काम करत आहे. त्यामुळे राष्ट्र म्हणून सर्व नागरिकांनी एकत्र येऊन कोरोनाच्या महामारी आजाराविरुद्ध युद्ध पूकारून त्यात यशस्वी होण्याचा महानिर्धार करावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

6

4