नडगिवे खारेपाटण परिसरात सर्वेक्षण पूर्ण;नऊ जणांची केली तपासणी…
कणकवली, ता.३० : सिंधुदुर्गात पहिला कोरोना पॉझिटिव्ह मिळालेच्या नडगिवे गावातील त्या रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या आणखीन 14 लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. तर थेट संपर्कात असलेल्या दहा लोकांपैकी नऊ जणांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली आहे.अशी माहिती कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पोळ यांनी दिली.
दरम्यान नडगिवे गावच्या सात किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. चार दिवसा पूर्वी नडगिवे गावातील एक व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह आली होती त्या दिवसा पासून या परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.त्यासाठी चार डॉक्टरांची दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेले आहेत.
कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्याही स्थितीवर आरोग्य यंत्रणेनें नियंत्रण मिळविले. आरोग्य यंत्रणेने खारेपाटण परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून प्रत्येकाची आरोग्य तपासणी सुरू केली. त्यासाठी 19 कर्मचारी आणि दोन वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली.महसूल, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने घराघरापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आजच्या घडीला नडगिवे,खारेपाटण परिसरात आरोग्य विभागाने सर्व आरोग्यसेवा दिली असून ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला त्या नडगिवे उपकेंद्रात दोन डॉक्टरांचे स्वतंत्र आरोग्य पथक नियुक्त केलेले आहे.डॉक्टर प्रणिती इंगवले यांच्या नेतूत्वाखाली ही दोन्ही आरोग्य केंद्र काम करत आहेत.या परिसरातील कोणत्याही व्यक्तीला ताप ,खोकला, सर्दी अशा आजारांची लक्षणे दिसल्यावर खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नडगिवे गावातील लोकांनी तेथील उपकेंद्रात जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पोळ यांनी केले आहे.दहा लोक थेट संपर्कात आलेल्या पैकी एक व्यक्ती आरोग्यतपासनी करून घेण्यास नकार देत असल्याने त्याची तक्रार स्थानिक समितीकडे करण्यात आली असनु समजून ऐकल्यास त्याचेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.