सिंधुदुर्गात बेघर व कामगारांसाठी १० ठिकाणी कॅम्प…

2

सिंधुदुर्गनगरी ता.३०: परराज्यातील मजूर, कामगार आणि बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात १० ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले आहेत.याठिकाणी ४४६ व्यक्ती रहात असून त्यांच्यासाठी निवाऱ्यासोबतच जेवण, खाणे,पिण्याचे पाणी यासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.यासाठी तालुकास्तरावर कॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये एकूण 10 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना पॉजिटीव्ह असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात सध्या 203 व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवलेले असून 57 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 34 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 33 नमुने निगेटीव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. काल पाठविण्यात आलेल्या 6 नमुन्यांचा अहवालही निगेटीव्ह प्राप्त झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट ऑफ कोवीड – 19 या बाबत एम्सतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. आय.एम.ए आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायीक यांच्याशी आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी चर्चा केली. यावेळी अत्यावश्यक प्रसंगी व्हेंटिलेटर्स व इतर वैद्यकीय उपकरणे यांचा वापर कोरोनाच्या उपचारांसाठी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली
होम क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 6 जणांवर गुन्हे दाखल
होम क्वारंटाईन अर्थात घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना दिलेल्या सूचना पाळणे बंधनकारक आहे. त्यांना गर्दीमध्ये मिसळण्यास तसेच प्रवास करण्यास मनाई आहे. असे असतानाही याविषयी दिलेल्या सुचनांचे पालन न केल्या प्रकरणी जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्या 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तर जमावबंदीचे आदेश मोडल्या प्रकरणी आतापर्यंत 84 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालकमंत्री यांनी घेतला आढावा
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामिण भागामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होम डिलीव्हरीच्या माध्यमातून देण्यात यावा अशा सूचना केल्या.
जिल्ह्यात सध्या ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे. आरोग्य संस्थांमार्फत आज एकूण 3493 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

1

4