आस्था ग्रुपच्या जनता बाजाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

ना नफा ना तोटा तत्वावर विक्री ; आठवड्यातून तीनवेळा बाजार भरणार…

मालवण, ता. ३१ : भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होत असल्याने येथील सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या आस्था ग्रुपच्या वतीने शहरात आज जनता बाजार भरवण्यात आला. यावेळी अर्ध्या किमतीत मिळणाऱ्या भाजीपाल्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. मात्र सोशल डिस्टसिंगचे पालन करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. केवळ दोन तासात जवळपास पाचशे किलो भाजीची “ना नफा ना तोटा” तत्वावर विक्री करण्यात आली. कोरोनाच्या कालावधीत आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा जनता बाजार भरविला जाणार असल्याचे आस्था ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र अशा परिस्थितीतही भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी येथील आस्था ग्रुपच्यावतीने आज सकाळी मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात जनता बाजार भरवण्यात आला. “ना नफा ना तोटा” तत्वावर अर्ध्या किमतीत भाजीपाला खरेदीसाठी यावेळी शहरवासीयांनी एकच गर्दी केली होती. मात्र या गर्दीमुळे कोरोना संक्रमणाला संधी मिळू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगवर कटाक्षाने लक्ष देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य आवर्जून गर्दी टाळण्यासाठी सूचना देत होते. याला नागरिकांनी देखील चांगले सहकार्य केले. अवघ्या दोन तासात पाचशे किलो हून अधिक भाजीपाल्याची या ठिकाणी विक्री झाली. जनतेची मागणी लक्षात घेऊन कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा जनता बाजार भरविला जाणार असल्याचे आस्था ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, सल्लागार सूर्यकांत फणसेकर, उपाध्यक्ष सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, खजिनदार विद्याधर केनवडेकर, सचिव मनोज चव्हाण, हरी चव्हाण, प्रशांत हिंदळेकर, आगोस्तीन डिसोझा, कुणाल मांजरेकर, रवींद्र मिटकर, सचिन पेडणेकर, पी. के. चौकेकर, संग्राम कासले, राजेश पारधी, अविनाश मांजरेकर, राजा मांजरेकर, सौ. कविता मांजरेकर आदींनी सहकार्य केले.

3

4