मच्छीमारी, मत्स्य विक्रीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत…

2

गर्दी न होण्याची दक्षता घ्यावी ; तोरसकर-सावजी- जोगी यांचे आवाहन…

मालवण, ता. ३१ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये विविध व्यवसायासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. मात्र मासेमारी आणि मत्स्यविक्रीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. केवळ मासेविक्री करताना मत्स्य विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी , असे आवाहन नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे सदस्य रविकिरण तोरसकर, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी आणि बाबी जोगी यांनी केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, मत्स्यव्यवसाय हा अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केला आहे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी वेंगुर्ला, मालवण, देवगड, सावंतवाडी येथील मासळी मंडई बंद ठेवली आहेत. त्यामुळे मच्छीमार आणि मत्स्यविक्रेत्या महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. यामुळे राज्य व केंद्र सरकारची मत्स्य व्यवसायाबाबत मार्गदर्शक तत्वे समजून घेण्यासाठी श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी आणि नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर यांनी प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली.
मालवण तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी तसेच मस्त्यव्यवसाय अधिकारी यांचा समावेश होता. सर्व अधिकारी आणि संबंधित कार्यालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार मत्स्यव्यवसाय तसेच मत्स्य विक्री करण्यास कोणतीही हरकत नाही असे निदर्शनास आले आहे. परंतु मासेमारी किंवा विक्री करताना योग्य अंतर राखून गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सर्व विभागांनी केले आहे. घरोघरी जाऊन मासे विक्री करणाऱ्या महिलांना कोणतीही आडकाठी नाही असे मत्स्यव्यसाय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तरी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन योग्य काळजी घेत मासेमारी आणि मत्स्यविक्री करण्यास कोणतीही हरकत नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

5

4