आमदार नीतेश राणे यांची प्रतिक्रिया….
कणकवली,ता.३१: लोकप्रतिनिधींचे शंभर टक्के वेतन घ्या मात्र कोरोनाशी मुकाबला करणार्या आरोग्य आणि पोलिस कर्मचार्यांच्या वेतनात कपात करू नका अशी प्रतिक्रिया आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केली आहे. सरसकट वेतनात कपात झाली तर या कर्मचार्यांच्या मनोवृत्तीवर परिणाम होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी यांचे वेतन 50 टक्के तसेच ‘अ’ आणि ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचार्यांच्या वेतनात 50 टक्के, तर क’ वर्ग कर्मचार्यांच्या वेतनात 25 टक्के कपात. तर ‘ड’ वर्गाच्या कर्मचार्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर आमदार नीतेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नागरिकांना होऊ नये यासाठी आरोग्य आणि पोलिस यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. या कर्मचार्यांच्या पगारात कपात झाली तर त्यांच्या मनोवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य व पोलिस या दोनही खात्यातील अधिकारी व कर्मचार्यांचे पगार कापू नका अशी विनंती आमदार राणे यांनी केली आहे.



