सुरक्षितेचा निर्णय योग्य…, परंतु जिल्ह्यात हिटलरशाही नको…

2

अमित सामंत;दुचाकी बंदी,मारहाण करणे अन्यायकारक असल्याची टीका…

कुडाळ,ता.०१:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेली सुरक्षिते संदर्भातली कारवाई योग्यच आहे.परंतु दुचाकी बंद करणे,मारहाण करणे असे प्रकार आणून कोणी जिल्ह्यात हिटलरशाही पुढे आणण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे मांडली.त्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे, त्यांनी असे म्हटले आहे.

जगात पसरलेल्या कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून करण्यात येणारे लाॅकडाऊन सारखे उपाय हे योग्यच आहेत. पण अत्यावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवून जनतेला दिलासा देण्याबरोबरच जिल्ह्यातील दुचाकी वाहनांवर बंदी घालणे अन्यायकारक आहे.या लोकांनी आपली दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची गरज भागवण्यासाठी जायचे कसे? याचा विचार दुचाकीवर बंदी घालताना प्रशासनाने केलेला नाही.प्रशासनाने सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका घ्यावी. वाहने जप्त करण्यापेक्षा दंडात्मक कारवाई करावी. तसेच पोलिसांनी हिटलरशाही भूमिका घेऊन जनतेला ञास देऊ नये. जिल्ह्यातील जनता संयमी आहे, याचा पोलिसांनी गैरफायदा घेऊ नये.जे चुकीचे वागतात त्यांच्यावर जरूर कारवाई करा.पण खरोखरच अत्यावश्यक कामानिमित्त लोक बाहेर पडत आहेत. त्यांना ञास देऊन संघर्षांत्मक परिस्थिती निर्माण करून विपरीत काही घडू नये, याची खबरदारी घेतली जावी.
सध्या जनतेच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी किराणा, दुकान,भाजीपाला,फळे,मटन,चिकन,मासे,गॅस,पेट्रोल,डिझेल यांचे व्यवहार सुरू ठेऊन जनतेला दिलासा दिलाय. पण या वस्तू आणायला जनतेने चालत फिरावे का? दुचाकी वाहनांवर बंदी मग अन्य वाहनांना का नाही?  फक्त दुचाकी वाहनांवर बंदी घालणे, हे जिल्ह्य़ातील दुचाकी वाहन धारकांवर अन्याय केला आहे. प्रशासनाने याबाबत फेर विचार करून ही बंदी उठवावी.जी मोठी शहरे आहेत तिथे हे नियम योग्य आहेत. पण काही शहरापासून ग्रामीण भागातील अंतर एक दोन कि.मी आहे. त्यांनी अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी कसे व कुठे जायचे?  या समस्यांची दखल प्रशासनाने घ्यावी.
या विषयावर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी सिंधूदूर्ग यांची भेट घेऊन याबाबत आवाज उठवून जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी केले आहे.

6

4