मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार…?

2

केंद्र शासनाने माहिती मागवली ; मत्स्य आयुक्तांकडून कार्यवाही सुरू…

मालवण, ता. १ : कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी सुरू झाल्यापासून मत्स्य व्यवसायावर झालेल्या परिणामांमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र शासनाने राज्यांना दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मत्स्य आयुक्तांनी प्रादेशिक मत्स्य उपायुक्तांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र शासनाकडून मच्छीमारांना नुकसानभरपाई विचाराधीन आहे असे या पत्रात म्हटले आहे.
कोरोनानंतर जाहीर झालेली टाळेबंदी व संचारबंदीमुळे मासेमारी व्यवसायालाही फटका बसला आहे. मालवणात ११ फेब्रुवारीला मत्स्य दुष्काळ परिषदेस उपस्थिती दर्शविणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांनी याबाबत शासनाने लक्ष वेधत नुकसानभरपाई म्हणून आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे राज्यभरातील मच्छीमारांच्या विविध संघटनांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र शासनाने ३० मार्च रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून नुकसानभरपाईची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान राज्याच्या मत्स्य विभागानेही कार्यवाही सुरू केली आहे. ही माहिती योग्य असल्याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडून खात्री करून घ्यावी. याकामी अवसानातील संस्थांचा समावेश करू नये, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

2

4