कणकवली बाजारपेठेत जाणारे सर्व मार्ग दुचाकीस्वारांसाठी बंद…

2

गर्दी टाळण्यासाठी शहरात कडक बंदोबस्त : अनेक दुचाकीस्वारांवर कारवाई…

कणकवली, ता.०७:  कणकवलीचा आठवडा बाजार होणार नाही असे काल नगराध्यक्षांनी जाहीर केले होते. तरीही दशक्रोशीतील ग्राहक शहरात येऊ लागल्याने शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर बाजारपेठेत येणारे सर्व मार्ग दुचाकीस्वारांसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान योग्य कारणाशिवाय फिरणार्‍या अनेक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
मागील मंगळवारच्या आठवडा बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आज कणकवली पोलिसांनी बाजारपेठेत कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील पटवर्धन चौकात तर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. यात विनाकारण शहरात येणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. शहरातील भालचंद्र आश्रम मार्ग, ढालकाठी, झेंडा चौक, पटकीदेवी मंदिर, रेल्वे स्टेशन, नरडवे रोड या ठिकाणी बॅरिकेट टाकून शहर बाजारपेठेत जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. याखेरीज सोशल डिस्टन्सचे पालन होण्यासाठी बाजारपेठेत दंगा काबू पथक तैनात आहे. दरम्यान आज सकाळपासून किराणा दुकाने तसेच मेडिकल दुकानांमध्ये ग्राहकांनी रांगा लावल्याचे चित्र आहे.

8

4