समुद्रातील होड्या, ट्रॉलर्स काढण्यास बंदर विभागाने परवानगी द्यावी…

2

आम. वैभव नाईकांच्या बंदर विभागास सूचना ; संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा…

मालवण, ता. ०७ : संचारबंदीमुळे वॉटरस्पोर्ट्स बंद असल्याने समुद्रात उभ्या केलेल्या स्कूबा डायव्हिंगसह अन्य मच्छीमारांच्या नौका बाहेर काढण्यासाठी बंदर विभागाने संबंधितांना आवश्यक परवानगी द्यावी अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी संचारबंदीच्या काळात व्यावसायिकांना भेडसावणार्‍या अन्य समस्यांचाही आढावाही त्यांनी घेतला.
मालवण तहसील कार्यालयात आमदार नाईक यांनी अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये, उमेश नेरूरकर, रवी तळाशिलकर, दीपक देसाई, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे सुनील मलये, किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संचारबंदीमुळे किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा पूर्णतः बंद आहे. त्यामुळे होडी वाहतूक संघटनेने केलेल्या मागणीनुसार त्यांच्या होड्यांना रंग काढण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्या. मच्छीमारांचे बल्याव, ट्रॉलर्स काढण्यासाठी आवश्यक जेसीबी उपलब्ध करून दिला जाईल असे तहसीलदार पाटणे यांनी स्पष्ट केले. सध्या शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहार पडून असून खराब होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी महावितरणने जाहीर केलेल्या सरासरी बिल, वाहतूकदारांनी दरात केलेली वाढ, रास्त धान्य यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

8

4