पाणी टंचाईची कामे संचारबंदीतून वगळणार

2

प्रमोद जठार यांची माहिती ः जिल्हाधिकार्‍यांशी भेट घेऊन चर्चा

कणकवली, ता.9 ः कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच कामे ठप्प असली तरी यातून पाणी टंचाईची कामे वगळली जाणार आहेत. तसेच सरपंच पातळीवर संमतीपत्रे तयार करून पाणी टंचाई कामांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. तशी ग्वाही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी दिली असल्याची माहिती माजी आमदार आणि भाजप नेते प्रमोद जठार यांनी आज दिली.
जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांच्या संदर्भात भाजपच्या प्रतिनिधी मंडळाने आज जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. त्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती श्री.जठार यांनी आज दिली. त्यांचेसोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे देशासह जिल्ह्याच्या विकास ठप्प झाल आहे. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था, इथला शेतकरी, मजूर, व्यापारी आदी सर्वच अडचणीत आले आहेत. त्यापार्श्‍वभूीवर करावयाच्या विविध उपाययोजना या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यात पाणी टंचाईची कामे प्राधान्याने घेण्याची विनंती केली. यात जमिनीची संमतीपत्रे सरपंच पातळीवर तयार करण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
सिंधुदुर्गात हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्यांचा पुरेसा साठा आहे. मात्र आणखी गोळ्या आवश्यक असल्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वसेकर यांनी केली आहे. त्याअनुषंगाने आम्ही केद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.जठार म्हणाले. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी काजू खरेदीदारांना शहरालगतच्या मोकळ्या मैदानामध्ये काजू खरेदीसाठी परवानगी द्यावी अशीही मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याचे श्री.जठार म्हणाले.

1

4