आनंदव्हाळ- कर्लाचाव्हाळ, सर्जेकोट मधील चौघांवर गुन्हा दाखल ; परवाना रद्द, गाड्या जप्तीची कारवाई…
मालवण, ता. ९ : आंबा वाहतुकीच्या गाडीतून मुंबईतून चाकरमान्यांना गावी आणल्याप्रकरणी तालुक्यातील चौघांवर मालवण पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या दोन पीकअप गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींना नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. यातील दोघांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
आंबा वाहतुकीचा पास घेऊन मुंबईला आंब्याच्या गाड्या घेऊन जाणार्यांनी यापूर्वी देवगडमध्ये मुंबईतून व्यक्तींना गावी आणल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यामुळे सर्वच ठिकाणी आंबा वाहतुकीच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यात येत होते. यातच आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ व सर्जेकोट या दोन गावांमध्ये मुंबईतून काही व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला.
यात आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथील महेश बाळू सांडव याने आंबा वाहतुकीची पिकअप गाडी क्रमांक एम. एच. ०७ एजे-०३२४ मधून भाऊ विष्णू बाळू सांडव याला २८ मार्चला येथे आणले तर सर्जेकोट येथील गोपाळ जयवंत कवटकर याने गाडी क्रमांक एम. एच. ०७ पी-२१९५ मधून मुलगा ओंकार गोपाळ कवटकर याला ६ ते ८ एप्रिल या कालावधीत येथे आणले. संबंधितांकडे याप्रकरणी चौकशी करून काल रात्री उशिरा या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या दोन्ही पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधितांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. ज्यांना मुंबईतून आणले त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर, सुभाष शिवगण हे अधिक तपास करत आहेत.