कोयता व दांड्याचा वापर ; परस्पर विरोधी गुन्हे दाखल….
वेंगुर्ले,ता.०९: तालुक्यातील उभादांडा येथे सार्वजनिक स्मशानभूमीच्या वादावरून आज गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास येथील दोन गटात दांड्या, कोयत्याने तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसात दाखल झालेल्या परस्पर विरोधी तक्रारीनुसार एका गटातील कान्होबा नवार, रामदत्त नवार व मधूकर तिरोडकर तर दुसऱ्या गटातील संदेश मोघे सहित २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
उभादांडा कांबळीवाडी येथील संदेश जीवराज मोघे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता आपल्या मित्राची आई रंजनी अनंत तांडेल (७५) ही मयत झाली. तिचा मृतदेह अंत्यविधी करीता ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घेऊन गेलो. त्यावेळी आम्ही सोशल डिस्टन्सिंग ने हा अंत्यविधी आमच्या कांबळीवाडी येथील पूर्वंपारच्या स्मशानभूमीत करत होतो. त्यावेळी याठिकाणी कान्होबा यशवंत नवार, त्यांचा मूलगा रामदत्त कान्होबा नवार व मधुकर रामचंद्र तिरोडकर हे आले आणि जागेवरून वाद घातला. त्याच दरम्यान यातील कान्होबा व रामदत्त यांनी आपला हातातील कोयत्यानी तर मधुकर यांनी लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या मारहाणीत वासुदेव महादेव मांजरेकर हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या उजव्या हाताला खोल जखम झाली. तर ज्ञानेश्वर दशरथ मांजरेकर यांच्या दोन्ही हाताच्या बोटाना जखम झाली. यातील वासुदेव मांजरेकर यांना अधिक उपचारासाठी वेंगुर्ले रुग्णालयातून ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या फिर्यादीनुसार कान्होबा, रामदत्त व मधुकर यांच्यावर वेंगुर्ला पोलिसात भा.द.वी. कलम ३२५’ ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर यावेळी कान्होबा यशवंत नवार (६८) यांनी वेंगुर्ला पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उभादांडा कांबळीवाडी येथील संदेश मोघे, बाबल्या मांजरेकर, सद्गुरू तांडेल, सुहास तांडेल, अमोल सावंत, श्री कांबळी यांच्यासह २० ते २५ जणांनी माझा मुलगा रामदत्त नवार व आपण काम करत असताना संदेश मोघे वैगरे ३५ ते ४० जण रजनी अनंत तांडेल यांचे प्रेत दहन करण्यासाठी आपल्या मालकीच्या जमिनीत घेऊन आले. यावेळी आपल्या जमिनीत प्रेत दहन करू नका असे सांगण्यासाठी गेलो असता वरील व्यक्तीं सहित १५ ते २० जणांनी आपणास व आपला मुलगा तसेच मधूकर तिरोडकर याना दांडे व कोयत्याने मारहाण केली. या मारहाणीत कान्होबा नावार यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या फिर्यादीवरून एकूण संदेश मोघे सहित २५ जणांवर पोलिसांनी भा.द.वी. कलम ३२४, ३५२, ३२३, १४३ व १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम पाटील, बिट अंमलदार रमाकांत दळवी करीत आहेत.