ओरोस,ता.१०: मालवण तालुक्यातील साळेल ग्राम पंचायतच्यावतीने कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी गावातील प्रत्येक घरामध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. तसेच जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. तसेच नागरी क्षेत्रात नगर पंचायत व ग्रामीण भागात ग्राम पंचायत आपल्या स्तरावर उपाय योजना राबवित आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी झटत आहेत.
त्याप्रमाणे साळेल ग्राम पंचायतने सुद्धा गावातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राम पंचायतने प्रत्येक घराला भेट देत प्रत्येकी दोन मास्क व सॅनिटायझरचे वाटप केली. यावेळी ग्रामसेवक सुशांत चौगुले, डाटा ऑपरेटर भूषण गावडे, कर्मचारी गणेश गावडे, स्वयंसेवक श्री जामदार, रामा धनावडे आदी यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळ:-साळेल:-साळेल ग्राम पंचायतच्यावतीने मास्कचे वाटप करताना ग्रामसेवक सुशांत चौगुले व अन्य