शहरात येणारे अंतर्गत रस्ते बंद; गुन्हे दाखल करण्याचे वरिष्ठांचे आदेश…
सावंतवाडी/ शुभम धुरी ता.१०: शहरात कामाशिवाय फिरणाऱ्या दुचाकीसह कारचालकांना रोखण्यासाठी आता शहराकडे येणारे अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.येथील मच्छी मार्केट परिसर, विठ्ठल मंदिर परिसर आदी परिसरात हे रस्ते आडव्या तारा टाकून तसेच लोखंडी पिंपे टाकुन बंद करण्यात आली आहेत.दरम्यान आता फक्त पायी चालणाऱ्यांना शहरात प्रवेश देण्यात येणार आहे.तसेच कामाशिवाय फिरणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल करू,असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश जाधव यांनी दिली.
आज शहरात आणखी कडक पद्धतीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.लाॅकडाउनच्या काळात बाजाराकडे येणारी गर्दी कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे आता पोलिसांनी वेगळा फंडा अवलंबण्यास सुरुवात केली आहे.यात मुख्य बाजारपेठेकडे येणारे अंतर्गत रस्ते तारा किंवा ऑइल पिंपरी टाकून बंद करण्यात आले आहेत.दरम्यान दुचाकीस्वार याठिकाणी येऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त पायी चालणाऱ्यांना शहरात मुख्य बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे.अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,अशी आजपासून कारवाई सुरू आहे,असे पोलिसांकडून सांगण्यात आले.