जहाज दुरुस्तीसाठी मागितली गोवा सरकारकडे परवानगी ; कोरोनामुळे मागणीचा विचार न झाल्याची माहिती…
मालवण, ता. १० : दुबई येथून श्रीलंकेला जाणाऱ्या जहाजाच्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज जिल्ह्याच्या खोल समुद्रात बंदस्थितीत उभे आहे. ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात दिसणारे हे जहाज किनारपट्टीवर चर्चेचा विषय ठरले आहे. हे जहाज दुरुस्तीसाठी गोवा बंदरात नेण्यासाठी जहाजावरील कॅप्टनने मागितलेल्या परवानगीबाबत कोरोनामुळे गोवा सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये दुबई शारजाह येथून श्रीलंकेतील वेस्ट कोस्ट शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे क्वारा स्टार या नावाचे ऑईलचे वाहतूक करणारे जहाज श्रीलंकेला निघाले. या जहाजावर १३ कामगार असून त्यात बहुतांश भारतीय कामगारांचा समावेश आहे. सहा सिलेंडर असणाऱ्या जहाजाचा एक सिलिंडर खराब झाला आहे. त्यामुळे हे जहाज निवती सिंधुदुर्ग यांच्यामधील ६ ते ७ नॉटिकल मैल खोल समुद्रात उभे केले आहे. या जहाजाच्या दुरुस्तीसाठी आणि अन्नधान्याचा साठा संपत आल्याने या जहाजाच्या कॅप्टनने गोवा सरकारच्या बंदर विभागाकडे गोवा बंदरात जहाज आणण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जहाजाबाबत अद्याप गोवा सरकारने त्यांच्या मागणीचा विचार केला नसल्याचे समजते. सिंधुदुर्गच्या खोल समुद्रात बंदस्थितीत उभ्या असलेल्या या जहाजाची दखल नौदलानेही घेतल्याची माहिती मिळाली आहे.