मालवण, ता. १० : भाजप नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळगाव, आंगणेवाडी, बागायतमध्ये कोरोनामुळे अडकून पडलेल्या गरजू आणि दुर्बल घटकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली.
कोरोनामुळे आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांनी कार्यकर्त्याना दिल्या आहेत. त्यानुसार आज भाजपच्यावतीने विविध ठिकाणी गरजूंना मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाळू कोळंबकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, बाबा परब, समीर नाईक, जि. प. सदस्या सरोज परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्वतःच्या माध्यमातून यावेळी धान्य वाटप केले. कांदळगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच उमदी परब, माजी सभापती उदय परब यांनी ग्रामस्थांच्यावतीने उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी गावातील अन्य समस्यांचा आढावा जि. प. अध्यक्षांनी घेतला. तसेच गावातील प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही दिली. यानंतर आंगणेवाडीमध्ये अडकून पडलेल्या सर्कस कामगारांना देखील मदत सुपूर्द करण्यात आली. बागायतमध्ये काही रस्ता कामगार अडकून पडल्याचे समजताच त्यांना देखील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. येथील छोट्या मुलांना बिस्कीट आणि फळेवाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.