नगरसेवक मंदार केणींची मागणी ; आम्हीही स्वयंसेवकांमार्फत काम करू…
मालवण, ता. १० : मालवण पालिकेने शहरातील स्वयंसेवकांना दिलेल्या पासवर पोलिसांनी आक्षेप घेत बंधने आणली. गाडी जप्त होत असल्याने स्वयंसेवक घाबरु लागले आहेत. शहरात सध्या नक्की कोण स्वयंसेवक आहेत हे नागरीकांना माहितच नाहीत. त्यामुळे तहसील कार्यालयाने मंजूर केलेल्या शहरी व तालुक्यातील स्वयंसेवकांची यादी जाहीर करावी, अशी मागणी नगरसेवक मंदार केणी यांनी केली आहे.
कोरोना लाॅकडाऊन परिस्थितीत जनतेला सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात व्यापारी, सामाजिक संस्था प्रामाणिक काम करत आहेत. पालिका क्षेत्रात स्वयंसेवक म्हणून काही पास देण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. परंतु त्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला. याबाबत तहसील कार्यालयात आम्ही लोकप्रतिनिधी लोकांच्या अडचणी सांगण्यास गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना भेटा अशीच उत्तर देण्यात आली. लोकप्रतिनिधीची या जबाबदार अधिकाऱ्यांना एलर्जी असेल तर आम्ही हा लाॅकडाऊनचा वेळ संपल्यावर त्याची दखल घेऊ, असा इशारा केणी यांनी दिला आहे.
तहसील कार्यालयातून दिवसेंदिवस पास देणे सुरू आहे. त्यामुळे हे पास नक्की कोणाला दिले याबाबत सांशकता आहे, गौडबंगाल आहे. अजुनही लाॅकडाऊन वाढु शकते त्यामुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासनाने तत्काळ स्वयंसेवकांची यादी जाहीर करावी. आम्ही लोकप्रतिनिधीही त्यांच्यामार्फत काम करण्यास सुरवात करु असेही केणी यांनी स्पष्ट केले आहे.