७२ तासात १५ हजार ५०० जण कोरोना रुग्णांची सेवा देण्यास तयार…
मुंबई ता.११: राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला.तसेच या कोरोना व्हायरसच्या संकटात निवृत्त वैद्यकीय कर्मचारी, ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केले आहे. किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा वॉर्डबॉय निवृत्त झाले आहेत.त्यांनी आमच्यासाठी संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी,असे आवाहन ठाकरे यांनी ८ एप्रिल रोजी केले होते.त्यानंतर वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर अवघ्या ७२ तासात वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १५ हजार ५०० व्यक्तींनी कोरोना रुग्णांची सेवा करण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई मिरर या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलंय की अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशिअन आणि शिक्षकांचा समावेश आहे. आता या सर्व अर्जाची छाननी केली जाणार असून, गरजेनुसार या लोकांना बोलवण्यात येणार आहे.