आंबा वाहतुकीच्या गाडीतून चाकरमान्याला आणले…

1367
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

नांदोस येथील दोघांवर गुन्हा दाखल ; देवगड- गोवळ येथून ट्रक, दुचाकी जप्त…

मालवण, ता. ११ : मुंबई वाशी मार्केटमध्ये आंब्याचा ट्रक घेऊन गेल्यानंतर देवगड येथे परतताना चाकरमानी मित्राला गावी आणल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी नांदोस येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ट्रक व दुचाकी जप्त करण्याची कारवाईही केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.
देवगड तालुक्यातील गोवळ येथील दत्ताराम रामचंद्र कोकरे यांच्या मालकीच्या ट्रकवरील चालक दत्ताराम मोहन गावडे रा. नांदोस हा देवगड येथून आंब्याचा ट्रक क्रमांक एम. एच. ०७ एक्स-१०९९ घेऊन मुंबई वाशी मार्केटमध्ये गेला होता. या दरम्यान गावडे याने आपला मित्र संदेश धोंडी गावडे याला बोलावून घेतले. हे दोघेही आंब्याच्या ट्रकमधून देवगड गोवळ येथे ७ एप्रिलला माघारी परतले. गोवळ येथे आल्यावर गावडे याने ट्रकमालक दत्ताराम कोकरे यांना संदेश हा आपला मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही ट्रकमालक कोकरे यांचा चुलतभाऊ प्रदीप गंगाराम कोकरे यांची दुचाकी क्रमांक एम. एच. ०७ एएफ- ०२९५ घेऊन तालुक्यातील नांदोस गावी आले. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे रक्मांगत मुंडे, योगेश सराफदार यांनी त्यांच्या घरी जात चौकशी करून त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. याप्रकरणी या दोघांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ताब्यातील ट्रक व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे रक्मांगत मुंडे, योगेश सराफदार, राजन पाटील, मंगेश माने हे करत आहेत.
आंबा वाहतुकीच्या गाड्यांमधून चाकरमान्यांना गावात आणले जात असल्याची जिल्ह्यातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. ट्रकचालक दत्ताराम गावडे याने मुंबईहून देवगड गोवळ येथे माघारी परतताना तपासणी नाक्यावर खोटी माहिती दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. सध्या राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती खबरदारी घेत असताना आंबा वाहतूक करणार्‍या गाड्यांमधून असे चाकरमानी आणले जात असतील तर ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आंबा, चिरे, वाळू वाहतूक करणार्‍यांना चालकांना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी योग्य ती समज द्यावी अन्यथा असे प्रकार पुन्हा आढळून आल्यास त्याला चालक-मालक संघटनेला जबाबदार धरले जाईल असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

\