दोडामार्ग घाटीवडे येथील घटना; नुकसानीमुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली…
दोडामार्ग/सुधाकर धर्णे,ता.११: गेल्या एक महिन्यापासुन विजघर,घाटिवडे,हेवाळे परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या हत्तींनी आता तर थेट शेतकऱ्यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला आहे.गुरुवारी बेळगाव दोडामार्ग रस्त्यावर दिसुन आलेल्या हत्तींनी शुक्रवारी रात्री घाटिवडे येथिल तुकाराम गावडे या शेतकऱ्यांच्या घराकडे थेट आपला मोर्चा वळविला अखेर या शेतकऱ्याने आपल्या मुलासमवेत आणि सहकाऱ्यांच्या मदतीने या हत्तींना पळवुन लावले.घडलेल्या या सर्व प्रकारमुळे परिसरातील शेतकऱ्यांमधे आणि गावकऱ्यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या महिन्या भरापासुन हत्तींच्या कळपाने घाटिवडे,बाबर्डे,हेवाळे परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे.यामधे एक हत्ती आणि एक मादी असा एक कळप तर दुसऱ्या कळपात एक मादी आणि दोन पिल्ले आहेत.या कळपाने शेतकऱ्यांच्या केळी माड सुपारी बागयतींचे नुकसान करत आता उन्हाळी पिक सुद्धा नष्ठ करायला सुरुवात केलेली आहे.यामुळे लाखो रुपयांचे नुकसान येथिल शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
वनविभाकडून राबवल्या गेलेल्या सर्व योजना आता पर्यत फोल ठरल्या आहेत.खंदक खोदुन वाटा बंद करणे,मधुमक्षिकांच्या पेट्या लावणे,दोरखंड बांधणे हे उपाय करुन देखिल हत्तींना रोखण्यात वनविभागाला यश आलेले नाही.मात्र यात नाहक भरडला गेला तो येथिल शेतकरी.गेल्या सात ते आठ वर्षात येथिल सुपारी,माड आणि केळी बागायतींचे लाखो रुपयांचे नुकसान हत्तींकडून झाले मात्र नुकसान भरपाई म्हणुन हाती लागली ती म्हणजे तुटपुंजी मदत.
नेहमी शेतीचे नुकसान करणारा हत्ती आता शेतकऱ्यांच्या घराकडे वळला असुन आता ते शेतकऱ्याच्या जिवावर आले आहे.निदान आता तरी वनविभागाने याकडे जाणिवपुर्वक लक्ष द्यावे अशी मागणी येथिल शेतकऱ्यांनी केली आहे.