चार दिवसांची पोलीस कोठडी; सोशल मीडियावर फोटो केलेला व्हायरल…
सावंतवाडी ता.११: राज्यप्राणी म्हणून ओळख असलेल्या दोन शेकरूंची शिकार केल्याप्रकरणी सावंतवाडी वन विभागाने अखेर कुणकेरी येथील “त्या” युवकाला अटक केली.लीलाधर वराडकर (वय २५),असे त्याचे नाव आहे.विशेष म्हणजे तो सैन्यात आहे.सुट्टीत आल्यानंतर त्याने हा प्रकार केल्याची कबुली दिली.त्याला येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याबाबतची अधिक माहिती या गुन्ह्याचे तपासी अंमलदार वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांनी दिली.
संबंधित युवकाने सुट्टीवर आल्यानंतर आठवड्याभरापूर्वी माडखोल गावात शेकरूंची शिकार केली होती. हा फोटो स्वतः त्याने व्हाट्सअप व सोशल मीडियावर व्हायरल केला होता.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथील वन्यप्राणी प्रेमी कडून वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करण्यात आली होती.त्यानंतर या प्रकारची चौकशी झालेली याबाबतची बातमी ब्रेकिंग मालवणीने काल रात्री उशिरा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर तपासाची सूत्रे वन अधिकाऱ्यांनी जोरदार फिरवली व सकाळी त्या युवकाला कुणकेरी येथून ताब्यात घेण्यात आले.यावेळी प्रथम आपण त्याने काश्मीरमध्ये ड्युटी बजावत असताना आपण फोटो काढला,असे सांगितले.परंतु वन अधिकाऱ्याने सखोल चौकशी केल्यानंतर आपण ही शिकार केल्याचे कबूल केले. दरम्यान त्याला सकाळी अटक करून आज येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल. ही कारवाई उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर, वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, प्रमोद राणे,दिलीप पेडणेकर, वनरक्षक विश्वनाथ माळी, सागर भोगणे, चन्द्रिका लोहार यांनी केली.दरम्यान यांच्यासमवेत नेमके आणखी कोण आहेत,त्याने नेमकी ही शिकार कुठे केली.कोणते हत्यार वापरले आदीबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे,असे पानपट्टे यांनी सांगितले.