राजन साळवींचा टोला ;कोरोनाच्या काळात टीका न करता जनतेची सेवा करा…
राजापूर ता.११: कोरोना विषाणुच्या साथीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रातील जनतेची कुटुंबप्रमुख या नात्याने रात्रंदिवस काळजी घेत आहेत.महाराष्ट्राच्या या कठिण काळात राजकीय हव्यासापोटी बेताल वक्तव्य करुन असंस्कृतपणाचा दाखवण्याऐवजी निलेश राणे यांनी जनतेची सेवा करावी व सोबतच त्यांच्या वडिलांना मिळालेल्या खासदारकीचे आत्मचिंतनही करावे,असा सणसणीत टोला आमदार राजन साळवी यांनी माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना लगावला.
माजी खासदार डॉ.निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्य होण्याच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार घेत आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री व लोकप्रतिनिधी तसेच अतिमहत्वाच्या सेवा बजावणारे अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणुच्या संकटाचा सामना करीत जनतेची काळजी घेत आहेत असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील जनता स्वत:हून मुख्यमंत्री रिलिफ फंडाला आर्थिक मदत करीत असताना काही भाजपाची मंडळी मुद्दामहून पंतप्रधान रिलिफ फंडाला मदत करा असे आवाहन करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा पैसा हा महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यावर खर्च व्हावा असे अपेक्षीत असताना भाजपाच्या नेत्यांनी यावरही राजकारण करावे हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे असेही ते म्हणाले.
निलेश राणेंनी महाराष्ट्राच्या या कठिण काळात बेताल वक्तव्य करुन राजकीय हव्यासापोटी प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये नाहीतर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असे खडे बोलही आमदार डॉ. राजन साळवी यांनी सुनावले.