उदय सामंताकडुन पाठराखण; चाकरमान्यांनी नाराज होवू नये,आहात तीथेच रहावे….
सावंतवाडी,ता.११: जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी येथिल नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले आहे ,तो त्यांचा मोठेपणा आहे. त्यामुळे कोण त्यांच्यावर टिका करीत असेल तर त्यांची तितकीशी दखल घ्यावीशी वाटत नाही, असा प्रतिटोला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिला.
दरम्यान गोव्यासह मुंबई पुण्यात अडकलेल्या चाकरमान्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्याच ठीकाणी रहावे, नाराज होवू नये, असे त्यांनी आवाहन केले. मात्र जो पर्यत कोरोनाचे भय मिटत नाही, तो पर्यत गोव्यातील एकाही पर्यटकला जिल्ह्यात येवू देणार नाही असे त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांनी आज जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी सावंतवाडीत आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक तहसिलदार राजाराम म्हात्रे,पोलिस निरिक्षक शशिकांत खोत,शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राउळ,युवा नेते अमेय तेेंडोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री सामंत यांना केसरकर यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणी काहीही टिका केली तरी त्यांनी घेतलेला निर्णय मला पटतो त्यांच्या म्हणण्यानुसार ते मुंबईत राहतात त्यांचा बॉडीगार्ड आणि अन्य कर्मचारी मुंबईचे आहेत. त्यामुळे कोणाला तरी अजाणतेपणी संक्रमण होवू शकते. मात्र तरीही ते स्वस्थ बसले नाहीत. तर त्यांनी आवश्यक तो पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे कोण चुकीच्या पध्दतीने अशा वेळी राजकारण करत असेल, तर ते योग्य नाही. सामंत पुढे म्हणाले, या ठीकाणी आम्ही लोकप्रतिनीधी म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांची काळजी घेणे गरजेचे आहे. मी सुध्दा जिल्ह्यात आल्यानंतर त्या ठीकाणी असलेल्या आरोग्य पथकाकडुन तपासणी करून घेतली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे टिकाच करणार त्यांना काय उत्तर द्यायचे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.