मास्कचे वाटप:रावजी यादव यांची माहिती…
ओरोस ता १२:
कोरोना प्रतिबंधासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास मर्यादा आल्या आहेत. मात्र, फुले, आंबेडकर प्रमिंनी या दोन्ही जयंती या महामनावांना आदर्श ठरतील अशाप्रकारे साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले मास्क वाटप करून हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, माता भिमाई, माता रमाई, माता सवितामाई यांची संयुक्त जयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्यावतीने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचा मनोदय होता. परंतू सध्याच्या कोरोनो आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय संविधानाच्या चौकटीतून शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संस्थेच्यावतीने ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती पासून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल या जयंती कालावधीमध्ये मास्क वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रमाणे ११ एप्रिल २०२० रोजी कुडाळ तालुक्यातील साळगाव भिमाईनगर येथे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव, सहसचिव नंददिपक जाधव, तुषार जाधव आदी उपस्थित होते.