रॉकगार्डन लगतच्या खडकाळ भागात अनोळख्या मृतदेहाचा अवशेष…

632
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बेपत्ता काव्या माजिकचा हा अवशेष असण्याचा अंदाज ; उद्या सकाळी अवशेष बाहेर काढला जाणार, स्कुबा डायव्हर्सनी केले स्पष्ट…

मालवण, ता. १२ : रॉकगार्डननजीकच्या समुद्रात खडकाळ भागात आज सकाळी अनोळख्या मृतदेहाचा अवशेष दिसून आला आहे. हा अवशेष चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सौ. काव्या माजिक हिचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्कूबा डायव्हर्सनी हा अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भरती असल्याने खडकाळ भागातील ढोलीत हा अवशेष अडकलेला असल्याने तो बाहेर काढणे त्यांना शक्य झाले नाही. उद्या सकाळी पाणी कमी झाल्यावर अवशेष बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे स्कूबा डायव्हर्संनी स्पष्ट केले.
शहरातील रेवतळे येथे राहणारी सौ. काव्या कृष्णा माजीक वय-२१ मूळ रा. दोडामार्ग ही विवाहिता ८ एप्रिलला रॉकगार्डन येथून बेपत्ता झाली होती. तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. गेले तीन दिवस तिचा समुद्रात शोध सुरू होता. आज सकाळी रॉकगार्डन येथील समुद्रात खडकाळ भागात स्कूबा डायव्हर्सकडून शोध सुरू असताना खडकाळ भागातील एका ढोलीत एक अवशेष दिसून आला. स्कूबा डायव्हर्संनी त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र समुद्री लाटांचा मारा या भागात होत असल्याने तेथपर्यत स्कूबा डायव्हर्संना पोचणे कठीण बनले होते. खडकाळ भागात दिसून आलेला तो पायाचा अवशेष असल्याचे दिसून आले. अन्य अवशेष याच ढोलीत अन्यत्र अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चार दिवसांपूर्वी रॉकगार्डन येथून बेपत्ता झालेल्या काव्या माजिक हिचाच हा अवशेष असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पूर्ण मृतदेह सापडला नसल्याने तो नेमका कोणाचा हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ज्या ठिकाणी हा अवशेष दिसून आला त्या खडकाळ भागात ढोली आहे. तेथपर्यत स्कूबा डायव्हर्संना पोचणे कठीण असल्याने जोपर्यंत भरती कमी होत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागेल असे स्कूबा डायव्हर्संनी स्पष्ट केले. रॉकगार्डननजीकच्या समुद्रात खडकाळ भागात एक अवशेष आढळून आल्याची माहिती मिळताच काव्या हिचा पती कृष्णा माजिक, मेहुणा तसेच अन्य मित्र परिवार घटनास्थळी दाखल झाला होता.
काव्या माजिक हिचा ८ एप्रिलला लग्नाचा वाढदिवस होता. तिने मोबाईलवरून पती कृष्णा माजिक यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याखाली रॉकगार्डन असा उल्लेख केलेला संदेश पाठविला होता. ती सकाळच्या सत्रात रॉकगार्डन येथील खडकाळ भागात बसली असल्याचे काही स्थानिकांनी पाहिले होते. ज्यावेळी कृष्णा माजिक हे घटनास्थळी पोचले त्यावेळी त्यांना काव्या ही बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी केवळ पर्स, मोबाईल, ओढणी व एक चप्पल आढळून आले होते. तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पहिल्या दिवशी स्थानिक स्कूबा डायव्हर्संनी तिचा रॉकगार्डन नजीकच्या समुद्रात सायंकाळपर्यंत शोध घेतला होता. मात्र ती सापडून आली नाही. गेले तीन दिवस तिचा मृतदेह न सापडल्याने ती बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. यातच आज त्याचठिकाणी खडकाळ भागात एक अवशेष आढळून आला आहे. हा अवशेष काव्या माजिक हिचाच असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्ण मृतदेह मिळाल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. परंतु काव्या हिने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, विलास टेंबुलकर हे करत आहेत.
आपत्कालीन ग्रुपने आज सकाळी शोधमोहीम राबविली असता हा अवशेष दिसून आला. उद्या सकाळी खडकाळ भागात अडकलेले अवशेष बाहेर काढण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या शोधमोहिमेत आपत्कालीन ग्रुपचे दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, आझीम मुजावर, भालचंद्र परब, संदेश राऊळ, प्रशांत गावडे, गणेश पाडगावकर, जगदीश तोडणकर, आसिफ मुजावर, ढोले बाबू, तुषार मुळेकर, देवेंद्र मराळ, अक्षय मराळ, सोनू तोडणकर आदी सहभागी झाले होते.

\