शहरातील एकावर गुन्हा दाखल ; ग्रुप एडमीनने दिली तक्रार…
मालवण, ता. १२ : व्हाट्सएप ग्रुपवरून पोलिसांची बदनामी करणारा मॅसेज प्रसारीत केल्याप्रकरणी शहरातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमण वाईरकर असे संशयितांचे नाव आहे. हा गुन्हा काल सायंकाळी घडला. याप्रकरणी ग्रुप एडमीनने पोलिसांत तक्रार दिली आहे.
शहरातील मालवण पत्रकार – मित्र ग्रुपवर काल सायंकाळी शहरातील स्वयंसेवकांची तहसीलदारांनी प्रसिद्ध केलेली यादी टाकण्यात आली. यावर कॉमेंट करताना रमण वाईरकर यांनी ” मालवण शहर तहसीलदार यांच्याकडील ७१ आणि पालिकेचे १७२ म्हणजे २४३ गाड्या रस्त्यावर फिरायला मोकळ्या. गावातील शहरात येणार त्या वेगळ्या. विनापास गाडी पकडली तर आंब्याच्या पेट्या आणि मासे घरपोच झाले की गाड्या सोडून द्यायच्या.” आणि ” आंब्याच्या पेट्या देऊन गाडी सोडली आहे म्हणून लिहिले.” असे मॅसेज केले होते. ही बाब ग्रुप एडमीन कुणाल मांजरेकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी श्री. वाईरकर याना त्याच ग्रुपवर मॅसेज टाकून पोलिसांवरील आरोपांचा खुलासा करावा, अशी सूचना दिली. मात्र त्यावर समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे श्री. मांजरेकर यांनी रमण वाईरकर यांच्या विरोधात काल रात्री उशिरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीवर पोलिस अप्रितीची भावना चेतावणे अधिनियम १९२२ चे कलम ३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.