नगरपंचायतीचा उपक्रम ः नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन
कणकवली, ता.13 ः शहरातील मुख्य पटवर्धन चौकात निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केल्यानंतर कणकवली नगरपंचायतीने शहरात विविध ठिकाणी हॅण्डवॉश सेंटरही सुरू केली आहेत. या ठिकाणी मुबलक पाणी आणि हॅण्डवॉश ठेवण्यात आले आहेत. कामानिमित्त बाहेर पडणार्या नागरिकांनी या हॅण्डवॉश सेंटरचा वापर करावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी घरीच राहून कोरोनापासूच बचाव करावा असेही आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
कणकवली शहरात आज पटकीदेवी मंदिर, नरडवे फाटा, रेल्वे स्टेशन, पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेली आळी डीपी रोड कॉर्नर या ठिकाणी मुबलक पाण्यासह हॅण्डवॉश नगरपंचायतीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले. याखेरीज आवश्यकता भासल्यास शहराच्या इतर भागातही अशी सेंटर उभी केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिली.
कणकवली शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडावे लागते. या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर्स उभी करण्यात येत आहेत. आज शहरातील विविध ठिकाणच्या हॅण्डवॉश सेंटरचे लोकार्पण नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अतुल पिंपळे, नगरसेवक विराज भोसले, डॉ.गुरुदास कडुलकर, नगरपंचायत अधिकारी किशोर धुमाळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.