सुरेश भोगटेंची मागणी; लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन…
सावंतवाडी ता.१३: येथील नागरिकांची शिधापत्रिका कार्डे काही कामानिमित्त सेतू सुविधामार्फत पुरवठा विभागाकडे जमा करण्यात आली आहेत.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अशा लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली.यावेळी श्री.म्हात्रे यांनी सकारात्मक भूमिका घेत लाभार्थ्यांची शिधापत्रिका कार्ड लवकरात-लवकर उपलब्ध करून देऊ,असे आश्वासन दिले.याबाबतची माहिती श्री.भोगटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, केसरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानदारांनी धान्य देण्याचे शासनाचे धोरण असताना काही रेशन दुकानदारांकडून केसरी कार्डधारक लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती केली जात आहे.त्यामुळे अशा लाभार्थ्यांनामध्ये प्रशासनाबाबत नाराजी आहे.याबाबत त्यांनी तहसीलदारांकडे पाठपुरावा केला.यावेळी कुठल्याच रेशन दुकानदारांना अशाप्रकारे दाखल्याची सक्ती करता येणार नाही,या विषयाकडे मी स्वतः गांभीर्याने लक्ष देईन,असे श्री.म्हात्रे यांनी सांगितले.