धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीची मागणी; जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांना निवेदन…
सिंधुदुर्गनगरी ता.१३: कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेली संचारबंदी झुगारून या संचारबंदी कालावधीत आपले मूळ गाव सुपे. तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे जिल्हा परिषदेची गाडी घेऊन गेलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यावर संचार बंदीचे उल्लंघन करून समाजात धोका निर्माण होईल,असे कृत्य केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समिती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना याबाबतचे लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अशोक नानासाहेब कडूस माध्यमिक शिक्षणाधिकारी हे दिनांक 31 मार्च 2020 रोजी रात्री सिंधुदुर्ग जिलह्यातून त्यांचे मूळ गाव सुपे, ता. संगमनेर. जिल्हा अहमदनगर येथे हुंडाई क्रेटा या चारचाकी जिल्हा परिषदेच्या गाडीने प्रवास करून गेले आहेत.
सध्या जगामध्ये कोरोना महामारी पसरलेली असून, त्याचा परिणाम आपल्या देशांमध्ये सुद्धा झाला आहे. त्या अनुषंगाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषाणूचा प्रवास रोखण्याकरिता संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे. सदर संचार बंदी मध्ये भारतामधील कोणत्याही नागरिकाने अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे हा कायदेशीर गुन्हा आहे. असे असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री कडूस यांनी संचार बंदीचे उल्लंघन करून ते आपल्या मूळ गावी गेले आहेत. अशोक कडूस हे माध्यमिक शिक्षणाधिकारी असून हे महाराष्ट्र शासनाचे जबाबदार अधिकारी आहेत. त्यांना कायद्याचे पूर्ण ज्ञान अवगत आहे. तरीसुद्धा त्यांनी संचारबंदी चे उल्लंघन करून समाजात धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे. त्यामुळे कडूस व त्यांच्या बरोबर गेलेल्या चार व्यक्ती यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188, 269. 270, 272, 271, 290 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 तसेच साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 चा कायदा 11 अनुषंगाने कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी विनंती केली आहे. या पत्रावर धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समिती शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रकांत खरात यांचे नाव आहे.