वेतन देण्याची कार्यवाही सुरू;आमदार नाईकांच्या मागणीची दखल…
कणकवली, ता.१३ : एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देण्याबाबत आ.वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे निर्देश दिले आहेत.वेतन देण्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
मागील महिन्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने या कर्मचाऱ्यांचे हाल होत असून गैरसोय होत आहे.लॉकडाऊन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पैशांची कमतरता भासत आहे. आ.वैभव नाईक यांनी आज देवगड एसटी आगारात भेट दिली त्यावेळी तेथील एसटी कर्मचाऱ्यांनी व जिल्ह्यातील इतर एसटी कर्मचाऱ्यांनी आ.वैभव नाईक यांच्याकडे वेतन रखडल्याची बाब मांडली. याबाबत आ.वैभव नाईक यांनी तात्काळ परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची मागणी केली.या मागणीची दखल घेत परिवहनमंत्री अनिल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे निर्देश दिले असून कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.