‘त्या’ मृतदेहाच्या एका अवयवाचा अवशेष बाहेर काढण्यात आपत्कालीन पथकास यश…

684
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

मृतदेहाचे अनेक तुकडे, खडकाळ ढोलीत अडकले ; मिळालेला अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठविणार…

मालवण, ता. १३ : रॉकगार्डनलगतच्या समुद्रातील खडकाळ भागात काल दिसून आलेल्या अनोळख्या मृतदेहाच्या एक अवयवाचा अवशेष बाहेर काढण्यात आज आपत्कालीन पथकाला यश आले. या अवयवाच्या अवशेषाबरोबर फाटलेला पायजमाही मिळाला आहे. हा अवशेष ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले आहेत. ते खडकांच्या ढोलीत इतरत्र विखुरले असून ते सर्व बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन पथक उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत होते.
रॉकगार्डन नजीकच्या समुद्रात काल सकाळी अनोळख्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या एका अवयवाचा अवशेष समुद्रातील खडकात दिसून आला होता. मात्र भरतीमुळे आपत्कालीन पथकातील सदस्यांना तो बाहेर काढणे अशक्य बनले होते. त्यामुळे आपत्कालीन पथकातील सुजीत मोंडकर, बाबू ढोले, विकी खोबरेकर, दयानंद चव्हाण, पृथ्वी लोणे, आझीम, दिनेश तोडणकर यांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच हे अवशेष बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असल्याने तसेच ते खडकांच्या ढोलीत अडकले असल्याने तेथपर्यंत पोचून ते बाहेर काढणे कठीण बनले होते. यात सात ते आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेहाच्या एका पायाचा पंजा व फाटलेला पायजमा हे काढण्यात आपत्कालीन पथकाच्या सदस्यांना यश मिळाले. मिळालेला अवशेष ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
८ एप्रिलला सौ. काव्या माजिक ही विवाहिता रॉकगार्डन येथून बेपत्ता झाली होती. तिने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता समुद्रात मिळालेला अवशेष व कपडे हे तिचेच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पूर्ण मृतदेह अद्याप मिळालेला नसल्याने तो तिचाच मृतदेह आहे हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मिळणारे सर्व अवशेष हे डीएनए चाचणीसाठी पाठविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काव्या हिचे पतीसोबत ७ तारखेला रात्री जेवणावरून भांडण झाले होते. दुसर्‍या दिवशी लग्नाचा वाढदिवस असल्याने याचे तीन संदेश तिने पतीला पाठविले होते. शेवटचा संदेश तिने सव्वा नऊ वाजता केला होता. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यामुळे पूर्ण मृतदेह मिळाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, विलास टेंबुलकर, आशिष कदम हे तपास करत आहेत. दरम्यान कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी पोलिस ठाण्यास भेट देत माहिती घेतली.

\