सतीश सावंत; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी…
सिंधुदुर्गनगरी ता.१३: पावसाळा जवळ आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीपुरवठाची कामे, घरकुलांची कामे, शाळा दुरुस्ती यासारखी अत्यावश्यक कामे चालू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे
सध्या देशामध्ये थैमान घालत असलेल्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वांनाच कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संचार बंदीमुळे अनेक कामे ठप्प झाली आहेत मात्र सद्यस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ही चांगली बाब आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक कामांचा विचार होणे आवश्यक आहे. पावसाळा जवळ आल्याने अत्यावश्यक कामे होणे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत इमारत बांधकाम व्यवसाय पूर्णतः बंद आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच बँकांकडून कर्ज घेऊन ज्यांनी घरांची बांधकामे यापूर्वी चालू केली आहेत या कालावधीत बंद आहेत. पावसाचा विचार करता या घरांच्या कामांना परवानगी मिळावी, वाळू, खडी, सिमेंट हे साहित्य योग्य त्या यंत्रणेमार्फत परवाना पद्धतीने संबंधितांना उपलब्ध करून देण्यात यावेत, साकव व ब्रिज यांची कामे काही ठिकाणी चालू झाली आहेत ती अपूर्ण राहिल्यास पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटून लोकांचे हाल होणार आहेत. त्यामुळे याही कामांना सुरू करण्याची मान्यता मिळावी. एप्रिल-मे महिन्यांमध्ये जिल्ह्यातील परत गावांमध्ये पाण्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्यादृष्टीने नळयोजना व पाणीपुरवठा यांच्या दुरुस्तीच्या कामांना, घरांचे छप्पर दुरूस्ती, शाळा इमारत दुरुस्ती आधी कामांना मान्यता द्यावी तसेच लाकूड वाहतुकीलाही परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.