सतीश सावंत; जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतून निधी देण्याची सुविधा…
सिंधुदुर्गनगरी ता.१३: कोरोना विरोधातील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने सहाय्यता निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड १९ खाते शासनाने जाहिर केले असून या खात्यात जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतून देणगी देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोवीड १९ साठी सहाय्यता निधी द्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पड़ते यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत केले.
येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय पड़ते म्हणाले की, जगभरासह देशात कोरोना साथीने थैमान घातले आहे. या कोरोना विरोधात देशाची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. शिवाय या कोरोना साथीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून हा निधी उभा करण्यासाठी शासनाने “मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोवीड १९” च्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत खाते उघडले आहे. याचा खाते नंबर 39239591720 असून आयएफसी कोड SBIN0000300 असा आहे. या खात्यावर नागरिकांनी सहाय्यता निधी जमा करावा असे आवाहन करण्यात येत आल्याचे त्यानी यावेळी सांगितले.
तसेच सतीश सावंत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोवीड १९ साठी निधी जमा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हातुनही या सहाय्यता निधीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सहाय्यता निधीचे खाते हे स्टेट बँकेचे असल्याने ग्रामीण भागातील जनतेला सहाय्यता निधी देण्यासाठी शहरी भागात जावे लागते. मात्र ज्या नागरिकांना सहाय्यता निधी मध्ये निधी द्यायचा आहे अशा नागरिकांना स्टेट बँकेत जाण्याची आवश्यकता नाही त्यांनी नजिकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत जावे आणि एनईएफटी मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत द्यावी. याबाबत नागरिकाना मदत केल्याची रितसर पावती दिली जाणार असल्याचे ही सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.