सिंधुदुर्गात १८ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त; विक्री करणाऱ्या १२६ जणांची चौकशी…
सिंधुदुर्गनगरी ता.१३: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व्यस्त असलेल्या पोलिस यंत्रणेला चकवा देत अवैध दारू वाहतूक आणि अवैध दारू विक्री करणाऱ्याना पोलिस दलाने चांगलाच दणका दिला आहे.जिल्ह्याभरात अवैध दारूवर केलेल्या करवाईत १७ लाख ७५ हजार ४३६ रुपयांची अवैध दारू आणि हातभट्टीसाठी लागणारे ६० हजार रुपयांचे रसायन जप्त केले आहे. तर दारू विक्री करणाऱ्या १२६ व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 संचारबंदी जाहीर करण्यात आले आहे. अशी स्थिती असताना देखील काही लोक दारुची वाहतूक तसेच अवैधरित्या दारू विक्री करत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना समजल्यानंतर गेडाम यांनी सर्व पोलीस ठाण्यांना या विरोधात कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार कणकवली, बांदा, दोडामार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करून एकूण १६ लाख ७२ हजार ४५६ रुपये इतक्या रकमेची अवैध दारू जप्त करून कारवाई केली. तसेच जिल्ह्यातील अन्य पोलिस ठाण्यांमध्ये दारू विकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून १ लाख २ हजार ९८० रुपयांची दारू जप्त केली आहे. त्याचप्रमाणे कणकवली पोलिस ठाणे हद्दीत हातभटयांवर कारवाई करून ६० हजार रुपयांचे रसायन आणि अन्य साहित्य उध्वस्त करण्यात आले. आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुरक्षित राहावी याकरिता जिल्हा पोलीस दल व्यस्त असल्याचा फायदा घेऊन दारू विक्रेत्यांनी अवैद्य दारूचा व्यवसाय करू नये याकरिता जिल्ह्यातील एकूण १२६ व्यवसायिकांची कसून चौकशी जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अवैद्य दारू विक्री करताना आढळून आल्यास व सामाजिक आरोग्य धोक्यात आणल्यास तात्काळ संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली आहे.