मालवण तालुक्यातील घटना ; आचरा पोलिसांकडून तपास सुरू…
मालवण, ता. १३ : मालवण तालुक्यातील एका गावात शिकारीदरम्यान बंदुकीची गोळी हाताला लागल्याने शिकारीच गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. संबंधितावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधिताने घरामागील पडवीत गोळी लागल्याची माहिती पोलिसांना जबाबात दिली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याने उपचारानंतर त्याची चौकशी केली जाणार असल्याचे आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांनी स्पष्ट केले.
मालवण तालुक्यातील एका गावात चार दिवसांपूर्वी शिकारीस गेलेल्या एका शिकारीच्या हाताला बंदुकीची गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. त्याला तत्काळ कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संबंधिताकडे चौकशी केली असता घराच्या मागील पडवीत चुकून हाताला गोळी लागल्याची माहिती जबाबात दिली आहे. सध्या संबंधितावर उपचार सुरू असल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर याची चौकशी केली जाणार असल्याचे आचरा पोलिसांनी स्पष्ट केले.
जखमी झालेल्या शिकार्यास कायम शिकारीस जाण्याची सवय असून तो शिकारीस गेला असतानाच त्याच्या हाताला बंदुकीची गोळी लागल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळापासून घरी परतेपर्यंत वाटेत सर्वत्र रक्त पडले होते. हे रक्ताचे डाग हटविण्यात आले असल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. ज्या बंदुकीची गोळी त्याला लागली ती त्याच्या वडिलांच्या नावावर असल्याचे समजते. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करणे आवश्यक आहे. जखमी झालेल्या शिकारीच्या नावे रास्त धान्य दुकान आहे. मात्र सध्या तो जखमी असल्याने गावातील लोकांचे रास्त धान्य दुकान बंद असल्याने मोठी गैरसोय झाली असल्याची माहितीही मिळाली आहे.