उदय सामंतांचे स्पष्टीकरण ;काजू फॅक्टरी आंबा कॅनिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न
सिंधुदुर्गनगरी ता.१४:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्यस्थितित एकही कोरोना रुग्ण नाही. हे सत्य असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केल्याप्रमाणे सिंधुदुर्गातही 3 मे पर्यंत लॉक डाउन कायम राहणार आहे. त्यामध्ये कोणतीही शिथिलता मिळणार नाही. मात्र जिल्ह्याची आर्थिक बाजू स्थिर रहावी यादृष्टीने काजू फॅक्टरी आणि आंबा कॅनिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व अटी शर्ती यांची पूर्तता करून व्यावसायिकांना जर व्यवसाय सुरु करायचे असतील तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागावी ती दिली जाईल. त्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, त्याचप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी कोरणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉक डाऊन कालावधी नंतर प्रशासकीय अधिकारी यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, आ. वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की जिल्ह्यातील लोकांमध्ये लॉक डाऊन बाबत काही संभ्रमावस्था आहे. जिल्ह्यात सध्या एकही करोना पॉझिटिव रुग्ण नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशात 3 मेपर्यंत लॉक डाऊन वाढविला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राहील असे या आदिच स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे लॉक डाऊन शिथिल करणे याचे अधिकार पालकमंत्री किंवा जिल्हा प्रशासनास नाहीत. त्यामुळे हे लॉक डाऊन तीन मेपर्यंत कायम राहील त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता मिळणार नाही.
जिल्ह्यात पुढे पावसाळा आहे त्यामुळे काही अत्यावश्यक सेवा म्हणून कामे सुरू करण्याबाबत विचार झाला आहे. तसेच जिल्ह्याची आर्थिक बाजूही स्थिर रहाणे गरजेचे आहे आणि जिल्ह्याची आर्थिक स्थितीही आंबा-काजू यावर अवलंबून आहे. त्यामुळे आंबा कॅनिंग व्यवसाय तसेच काजू कारखाने सुरु करावेत असा विचार आजच्या बैठकीत करण्यात आला. आंबा काजू तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी यापूर्वीच परवाने देण्यात आले आहेत हे परवाने यापुढेही कायम राहणार आहेत. मात्र आंबा कॅनिंग तसेच काजू फॅक्टरी सुरू करण्यासाठी संबंधित व्यवसायिकांनी संचारबंदी तसेच कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यवसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर परवानगी घ्यावी. याच बरोबर अन्य व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा शेती पूरक व्यवसाय, त्याचप्रमाणे शाळा दुरुस्ती, बांधणी, साकव दुरुस्ती, घरकुलाची बांधकामे याबाबतही गरज लक्षात घेऊन या कामांना परवानगी दिली जाणार आहे. मात्र संबंधितांनी प्रशासनाची याबाबतची खात्री पटवून देणे आवश्यक आहे. ही खात्री झाल्यानंतरच जिल्हा प्रशासन कोणती कामे सुरू करायची आणि कोणती नाही याबाबत निर्णय घेईल आणि रीतसर परवानगी देईल मात्र रीतसर परवानगी न घेता कोणतीही कामे करता येणार नाहीत. तसेच गर्दी होणार नाही, संचारबंदी आणि करोना बाबत घ्यावयाची काळजी या नियमांचे पालन होईल याची खबरदारी संबंधितांनी घेणे बंधनकारक राहणार आहे.
कॅन्सर, एच आय व्ही बाधितांची औषधे घरपोच देणार
जिल्ह्यात काही कॅन्सरचे रुग्ण आहेत त्यांची ट्रीटमेंट मुंबई येथून सुरू आहे अशांना मुंबई येथे औषधे मिळतात मात्र ही औषधे या सर्वांना घरपोच मिळावीत यासाठीच्या सूचना तसेच एच आय व्ही बाधित रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात न येता ही औषधे त्यांच्या घरपोच मिळावीत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांना सूचना करण्यात आल्या असून त्याप्रमाणे ते कारवाई करणार आहेत. औषधे घरपोच मिळावी यासाठी कॅन्सर आणि एचआयव्ही अशा सर्व रुग्णांची यादी तयार करून तसे नियोजन करण्यात येणार आहे असेही नासा मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मे अखेर पर्यंत पर्यटकांना परवानगी नाही.
देशात तीन मेपर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानंतरही म्हणजे मे अखेरपर्यंत कोणत्याही पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. मे नंतर पावसाळा सुरू होतो. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय ऑक्टोबर नंतर सुरू होईल असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे या लॉक डाऊन ची नियमावली बुधवारी जाहीर होईल त्यानंतरच काय निर्णय घ्यायचा हे निश्चित होईल त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनही काय निर्णय देतो यावरही आपले लक्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत काही सूट देता येईल का याचा विचार सुरू आहे
चाकरमान्यांबाबत जनतेने सतर्क राहावे
लॉक डाऊन कालावधी सुरू असला तरीही जिल्ह्यात चोरट्या मार्गाने किंवा काही परवाना घेऊन चाकरमानी दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात येणारे ही सर्व आपलीच आपल्या घरातीलच माणसे आहेत, हे सत्य असले तरीही कोरोना या विषाणूंचा धोका लक्षात घेता जर जिल्ह्या बाहेरून आपल्या घरी कोणी आले असेल तर ही माहिती लपवून न ठेवता स्थानिक नागरिक तसेच घरातील लोकांनीही प्रशासनाला द्यावी जेणेकरून त्यांची तपासणी करता येईल यासाठी जिल्हावासीयांना सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले जिल्ह्यात सर्वच व्यवसाय उद्योग ठप्प झाले आहेत. या सर्व गोष्टी हळूहळू सुरू व्हाव्यात असा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील महामार्गाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरू करावे की न करावे हा केंद्राचा निर्णय आहे, मात्र हे काम सुरु झाल्यास यावर काम करणारे कामगार आता बाहेरून येणार नाहीत ते इथेच आहेत मात्र हे काम सुरू होण्यापेक्षा जिल्ह्यातील काही अती गरजेची कामे आहेत, ती सुरू करणे आवश्यक आहे आणि तसा प्रयत्न राहील असेही यावेळी नामदार सामंत यांनी स्पष्ट केले.