मालवण, ता. १४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमा बंद असताना तालुक्यातील कुमामे नागिंदेवाडी येथील एका युवकाने वास्को गोवा येथून पायी चालत गाव गाठल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित युवक वास्को येथे कामास असून ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते १० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या मुदतीत या युवकाने राज्याच्या सीमा बंद असताना पायी चालत गाव गाठल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर कोरोना अनुषंगाने दिलेल्या खबरदारीच्या नियमांचे उल्लंघन करून जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे रुक्मांगत मुंडे अधिक तपास करत आहेत.