अतुल काळसेकर यांची मागणी ; काजू बियांना प्रतिकिलो १२० रुपये दर मिळायला हवा
कणकवली, ता.१५: सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकर्यांसाठी 85 ते 100 रुपये प्रतिकिलो असा दर कारखानदार संघाने घोषित केला आहे. मात्र 120 रुपयांपेक्षा कमी दर मिळाला तर काजू उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रतिकिलो काजू मागे 20 रुपयांचे अनुदान द्यावे. त्यासाठी 100 कोटींचे अनुदान पॅकेज काजू उत्पादक शेतकर्यांसाठी जाहीर करावे अशी मागणी भाजपनेते अतुल काळसेकर यांनी आज केली.
श्री.काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्गातील काजू खरेदी विक्री प्रक्रिया ठप्प आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी नुकतीच वेंगुर्लेत बैठक घेतली. यात 85 ते 100 रुपये प्रतिकिलो हा दर निश्चित करण्यात आला. बांदा-दोडामार्ग विभागासाठी 100, सावंतवाडी 85, कणकवली 90 आणि वेंगुर्ले विभागासाठी 80 रुपये असा दर निश्चित झाला आहे. मात्र एवढ्या कमी दराने काजू विकला गेला तर काजू उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहेत. तर कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट कोसळल्याने काजू प्रक्रिया उद्योजक देखील अडचणीत आले आहेत. त्यामुळे काजू उत्पादक आणि काजू प्रक्रिया उद्योजक या दोहोंनाही सावरण्यासाठी सरकारने काजू बियांसाठी प्रतिकिलो 20 रुपये अनुदान द्यावे.
श्री.काळसेकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी राज्य सरकारने शेतकर्यांकडील सर्व दूध खरेदी करण्याची तयारी दर्शवली, त्याच धर्तीवर कोकणातील काजू उत्पादक शेतकर्यांसाठी सरकारने पुढे यावे. त्यासाठी आमदार नीतेश राणेंसह आमदार वैभव नाईक आणि आमदार दीपक केसरकर यांनी प्रयत्न करावेत असेही आवाहन श्री.काळसेकर यांनी केले.