ओरोस ता १५: जिल्हयातील न्यायाधीश आणि न्यायालयीन अधिकारी कर्मचारी यांनीही कोरोनाच्या या राष्ट्रीय आपत्ती काळात आपतग्रस्तासाठी दातृत्वाचा हात पुढे केला आहे.या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या स्वयंसेवी संस्थाना धान्य स्वरूपातील मदत देण्यात आली असुन या आजाराचे संकट निवारण होत नाही.तोपर्यंत मदत देण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस.आर. जगताप याच्या पुढाकारातून पणदूर येथील संविता आश्रम आणि माणगाव आंबेरी येथील चेरीश मतिमंद वसतिगृह या संस्थाना धान्य स्वरूपात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यात आला. देशात कोरोना या आजाराने थैमान घातले असल्याने आर्थिक गणिते कोलमडली आहेत. अशातच इतरासाठी काम करणाऱ्या या संस्थानाही या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यांनीही येथिल आश्रितांसाठी मदत देण्याचे आवाहन केले होते. जिल्हयाचा न्यायिक विभाग त्यांच्या मदतीसठी धावून आला आहे.
जिल्हयातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या कार्याला हातभार लावला आहे. पणदूर येथील आश्रमात जिल्हय़ातील विविध न्यायालयातील न्यायाधीशानी एकत्र येत या वस्तूचे वाटप केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव. डी. बी. माल्हटकर, कुडाळ न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एस. बी. पाटील, वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. डी. पाटील तसेच न्यायालयीन अधिकारी कर्मचारी याच्यावतीने न्यायालयीन कर्मचारी अशोक पेडणेकर, भाग्यवंत वाडीकर, जॉनी डिसोझा, दिवाकर सावंत हे उपस्थित होते. सावंतवाडी येथील एका आश्रमाला सावंतवाडी न्यायाधीश श्रीमती रूपाली बेडगकर याच्या हस्ते या वस्तू देण्यात आल्या.