जयवंत गवस; ग्राहकांना घरबसल्या होणार भाज्या-फळे उपलब्ध…
सावंतवाडी ता.१६: शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक भाज्या-फळांची घरपोच सेवा मिळावी यासाठी “घरपोच ॲप” सुरू करण्यात आला आहे.या ॲपच्या माध्यमातून थेट शेतकरी ते ग्राहक अशा जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जाणार आहेत.त्यामुळे शहरातील नागरिकांनी हा ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घराबाहेर न पडता घरपोच सेवेचा लाभ घ्यावा व कोरोनाच्या युद्धात देशाला सहकार्य करावे,असे आवाहन घरपोच ॲप चे प्रमुख जयवंत गवत यांनी केले आहे.
या सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.दरम्यान अवघ्या सात ते आठ दिवसात जास्तीत जास्त ग्राहकांनी हा ॲप डाऊनलोड करून सेवेचा लाभ घेतला आहे.यात राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या सेवेचा लाभ घेण्यास पसंती दर्शवली व शहरातील नागरिकांना सुद्धा घराबाहेर न पडता या ॲपच्या माध्यमातून आपल्या घरात दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या भाज्या व फळांची घरपोच मागणी करावी,असे सांगण्यात आले .यावेळी नगराध्यक्ष संजू परब उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर आदींसह शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी व जबाबदार नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला.
या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या तसेच आंबा,चिकू,फणस आदींसह इतर सर्व फळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.सोबत या ॲप मध्ये ग्राहकांना त्या माला संबंधीची सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.यात तो माल कुठे पिकवण्यात आला ?, त्याची कशा प्रकारे मशागत करण्यात आली त्याचा?,दर्जा व किंमत आधी माहिती छायाचित्रासह उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे या सेवेत घरपोच अँप ने स्वतःला जास्त नफा मिळण्याची अपेक्षा न ठेवता ग्राहक आणि शेतकरी यांचा समन्वय ठेवून ही विक्री केली जाणार आहे.अशी माहिती श्री.गवस यांनी दिली.