जिल्हा परिषद पदाधिकारी,सदस्यांचा उपक्रम; २ लाख ३३ हजाराची केली मदत…
ओरोस ता १६
कोरोना प्रतिबंध उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी आपल्याला मिळणारे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकारी व सदस्य मिळून २ लाख ३३ हजार रूपये एवढी मानधन रक्कम होते.
कोरोना विषाणुने देशात थैमान घातले आहे. या विषाणुला रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाने आपली पूंजी खर्ची घातली आहे. देशातील दानशुर व्यक्ती, संस्था यांनी मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याला देशात भरघोस प्रतिसाद लाभत आहे. राज्यासह देशातील लोकप्रतिनिधींनी यासाठी सढळ हस्ते मदत केली आहे. त्याच बरोबर स्थानिक पातळीवर गरजू, गरीब व्यक्तींना मदत सुद्धा केली जात आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी आपल्याला मिळणाऱ्या मानधनातील एका महिन्याचे मानधन कोरोना प्रतिबंधासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांना हे मानधन वळते करण्यास सांगितले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीत हा निर्णय झाला.
जिल्हा परिषद अध्यक्ष यांना महिन्याला २० हजार रूपये, उपाध्यक्ष यांना १५ हजार रूपये मानधन मिळते. तर वित्त व बांधकाम सभापती, शिक्षण व आरोग्य सभापती, महिला व बाल कल्याण सभापती आणि समाज कल्याण सभापती यांना महिन्याला प्रत्येकी १२ हजार रूपये मानधन मिळते. या सहा पधाधिकारी यांचे एका महिन्याचे मानधन ८३ हजार रूपये होते. यातील ४० टक्के रक्कम म्हणजेच ३३ हजार २०० रूपये रक्कम पंतप्रधान यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तर ६० टक्के म्हणजेच ४९ हजार ८०० रूपये रक्कम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला आपआपल्या मतदार संघात फिरण्यासाठी महिन्याला ३ हजार रूपये भत्ता मिळतो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत एकूण ५० सदस्य आहेत. या सर्वांची एक महिन्याची भत्ता रक्कम दीड लाख रूपये होते. ही सर्व रक्कम मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.