राजू मसुरकर यांची माहिती; मोफत शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा…
सावंतवाडी.ता,१७: जिल्ह्यातील सावंतवाडी कुटीर रुग्णालय कणकवली व शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात जन आरोग्य योजना जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे आता मोठ्या खर्चाच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.येत्या आठ ते दहा दिवसात या तीनही रुग्णालयात संबंधित काउंटर लावण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य सहाय्यक संचालक बी.एस. नागावकर व आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मान्यता दिली आहे.यापूर्वी या योजनेमध्ये फक्त जिल्हा रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालयाचा समावेश होता. परंतु हर्निया गर्भ पिशवी अशा आजारावर फक्त शासकीय रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात यावी,अशा शासनाच्या सक्त सूचना असल्यामुळे येथील रूग्णांना अन्य जिल्ह्यात किंवा गोव्यात जावे लागते होते.परंतु या ठिकाणी आता योजना मंजूर झाल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे.विशेष म्हणजे शस्त्रक्रिया औषधोपचार मोफत होणार आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्णाची जेवणाची व प्रवासाची सोय सुद्धा मोफत होणार,त्यामुळे याचा फायदा येथील रुग्णांना निश्चित होईल,असा विश्वास मसुरकर यांनी व्यक्त केला.मात्र संबंधित योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पांढरे रेशन कार्ड वगळता सर्वांना याचा फायदा होणार आहे.