बी.एन.खरात; लॉकडाऊनच्या काळात शासनाचे दुर्लक्ष झाल्याची टीका…
सिंधुदुर्गनगरी,ता.१७: जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या धनगर समाज कोरोनाच्या काळात शासनाकडून देण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तु पासून उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी प्रयत्न करा. अशी मागणी ह्युमन राईट संस्थेचे सदस्य बी.एन खरात यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आपल्या अस्तित्वासाठी प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी धडपडणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या धनगर समाजाच्या वास्तवाकडे आज शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. या लाॅकडाऊन काळामध्ये आज हा समाज आपल्या प्राथमिक गरजा पासून कित्येक वर्ष वंचित आहे, त्यात कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीला घाबरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील या वाडी-वसत्यावर जाण्यासाठी आजही रस्ते नाहीत. यांच्याकडे जाण्यासाठी धड कोणतेच दळणवळणाचे मार्ग नसल्याने , पायी डोंगराळ भागातून या लोकांना पायपिट करावी लागते, या लॉकडाऊन च्या काळात त्यांच्यावर फार उपासमारीची वेळ आली आहे.त्यात त्यांचा पारंपरागत चालणारा शेळीपालन व्यवसाय धोक्यात आला आहे.त्यांना चारण्यासाठी या गावातून त्या गावात जाण्यासाठी परवानगी मिळत नाही.त्याचबरोबर शासनाची मदत व सुविधा मिळण्यासाठी त्यांच्याकडे राहते घर, जमीन, रेशनकार्ड नसल्याने, त्याचबरोबर लिहिता-वाचता येत नसल्यामुळे बँकेत पासबुक खाते नसल्याने त्यांना शासनाची मदत पोहोचण्यास विलंब होत आहे, अशावेळी शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माहिती मागून तात्काळ मदत केली पाहिजे. आज निवडणुकीच्या काळात चार-चार वेळा त्यांच्यामागे लागणारे कार्यकर्ते यांना या समाजाचा विसर पडल्याचा दिसतो आहे. मुळातच अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, रस्ता, शिक्षण यापासून मुळातच वंचित असलेल्या या समाजाला या महाभयंकर आपत्तीत शासनाची मदत मिळावी अशी मागणी पुनर्विलोकन समिती सिंधुदुर्ग सदस्य व ह्युमन राईट प्रेस पब्लिकेशन चे संचालक,समस्त धनगर ज्ञाती समाज संघटनाचे अध्यक्ष प्रा.बी.एन.खरात यांनी केले.